राज्यातील या शहरात नवीन तपासणी केंद्रे

पुणे: महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत. दरम्यान तरीही नवीन प्रकरणे समोर येत आहेत. वाढती संख्या पाहता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती.

यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. देशमुख म्हणाले, मुंबईतील भायखळा येथील जे. जे. महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे चाचणी केंद्र उभारण्यात आले असून यालाही उद्याच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा चाचणीसाठी केवळ एकच केंद्र उपलब्ध आहे.

या खाजगी केंद्रांचा यात समावेश:

यानुसार पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेन्ट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, थायरोकेयर लॅबरोटरीज, एस.आर. एल. डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज,नवी मुंबई या खासगी केंद्रांचा यात समावेश आहे. लवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत.

त्याच बरोबर शहरातील नायडू संसर्गजन्य रुग्णालय, पिंपरी-चिंचवडचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयात या रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा