पुणे, ४ सप्टेंबर २०२३ : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, न्यूझीलंडने इंग्लंडला हरवून मालिकेत पुनरागमन केले. हा सामना रविवार, ३ सप्टेंबर रोजी जबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडसाठी फिन ऍलनने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५३ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या.
इंग्लंडचा संघ विजयासाठी २०३ धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण, न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजी आणि तगड्या क्षेत्ररक्षणापुढे ते फार काळ टिकू शकले नाहीत आणि १८.३ षटकांत १२८ धावांवर सर्वबाद झाले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने २१ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ४० धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून न्यूझीलंडने इंग्लंडचा विजय रथ रोखला. ४ सामन्यांच्या या मालिकेत सध्या इंग्लंड २-१ ने पुढे आहे. या मालिकेत १ सामना बाकी आहे, जो ६ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन: जॉनी बेअरस्टो, विल जॅक्स, डेविड मलान, हॅरी ब्रूक, जोस बटलर (c&wk), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, ल्यूक वुड, गस ऍटकिन्सन.
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (wk), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, काइल जेमिसन, टिम साउथी (सी), मॅट हेन्री, ईश सोधी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड