नवी दिल्ली,( वृत्तसंस्था) दि.९ जून २०२०: सध्या जगभरात कोरोनाचे संकट वाढत असल्याचे दिसत असताना अनेक देशांना कोरोनाचा सामना करताना नाकी नऊ आले आहेत. अनेक देशात कोरोनामुळे बळींची संख्या ही वाढली आहे. मात्र यावर मात करत न्युझीलंड सारख्या देश कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
न्युझीलंड देशातील शेवटचाही रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र गेल्या १८ दिवसांपासून न्युझीलंड देशात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी याबाबतची नुकतीच माहिती दिली.
याबाबत त्या म्हणाल्या की, आता देशात कोरोना रूग्णांची संख्या शून्यावर आली आहे. सामाजिक आणि आर्थिक निर्बंध हटविण्याची घोषणा करताना न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी आता हा देश सामान्य स्थितीत परत येईल. यासाठी आम्ही तयार आहोत, असे सांगितले.
तसेच कोरोनाबाबतचे आमचे काम अद्याप संपलेले नाही. आम्ही कोरोना व्हायरसचा संसर्ग पूर्णपणे थांबवला आहे, मात्र, आमचे प्रयत्न या दिशेने सुरूच राहतील, असे जेसिंडा आर्डर्न यांनी सांगितले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आहे. या वृत्ताने मला खूप आनंद झाला आणि त्यावेळी मी डान्स केला, असेही जेसिंडा आर्डर्न यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सध्या जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ७१ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. जगभरात ४.४ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण ११५४ जणांना झाल्याची नोंद असून २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. न्युझीलंडची लोकसंख्या जवळपास ५० लाख इतकी आहे.
त्यामुळे कोरोनाबाबत न्यूझीलंड सरकारने घेतलेली कठोर पावले महत्त्वपूर्ण मानली जातात. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी सुरुवातीच्या काळात देशाच्या सर्व सीमा सील करून कडक नियम लागू केले होते. कोरोनामुक्त झाल्याने येथील पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: