वेलिंगटन, १४ फेब्रुवारी २०२३ :न्यूझीलंड सरकारने उत्तर बेटावर उष्णकटिबंधीय वादळाचा तडाखा बसल्यानंतर आज (मंगळवार) राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. न्यूझीलंडच्या इतिहासात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी २०२९ मध्ये क्राइस्टचर्च दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
- ४० हजारांहून अधिक घरांत बत्तीगूल
‘गॅब्रिएल’ चक्रीवादळामुळे न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहे. तसेच समुद्राच्या लाटाही उसळत आहेत. न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ४०,००० हून अधिक घरांची वीज गेली आहे आणि शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
- भूस्खलनामुळे अनेक गावांचे नुकसान
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हजारो घरांत वीज नसल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री किरन मॅकअनल्टी यांनी या घोषणेवर स्वाक्षरी केली. मॅकअनल्टी म्हणाले, ही एक अभूतपूर्व हवामान घटना आहे. ज्याचा उत्तर बेटावर मोठा परिणाम होत आहे. पुराचे पाणी आणि भूस्खलनामुळे देशभरातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले, मंगळवारी अधिक जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याची शक्यता आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.