ऑस्ट्रेलिया, २९ जानेवारी २०२१: भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण चालू आहे. भारत लस तयार केल्या जात असलेल्या देशांपैकी एक आहे. भारताने भारतातील नागरिकांचे लसीकरण तसेच इतर देशांमध्ये लस पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अश्या स्थितीत आता ती आकडेवारी समोर आली आहे ज्यात दर्शवले गेले आहे की कोणता देश कोरोना वर नियंत्रण मिळवण्यात किती यशस्वी झाला आहे.
कोरोना साथीच्या आजाराशी संबंधित असलेल्या ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी संस्थेच्या ९८ देशांच्या क्रमवारीत भारताला ८६ वे स्थान मिळाले आहे. न्यूझीलंडने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली, त्यानंतर व्हिएतनाम, तैवान, थायलंड आणि सायप्रस यांचा क्रमांक लागला. अमेरिकेचा क्रमांक ९४ वा आहे तर यूके ६६ व्या स्थानी आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सार्वजनिकपणे डेटा उपलब्ध नसल्यामुळे चीनला या क्रमवारीत स्थान देण्यात आले नाही. लोवी संस्थेने म्हटले आहे की सार्वजनिक डेटा उपलब्ध नसल्याने चीनचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही. डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोनाची पहिली घटना निदर्शनास आली होती.
पहिल्या १० मध्ये थायलंड, सायप्रस, रवांडा, आईसलँड, ऑस्ट्रेलिया, लाटविया आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. या यादीमध्ये अहवालात नोंदवलेली प्रकरणे आणि दरडोई मृत्यू या दोन्हीही आकड्यांचा समावेश आहे. एकूण ९६ देशांमध्ये सुमारे ३६ आठवड्यांचे मूल्यांकन केले गेले आहे.
२.५ कोटींपेक्षा अधिक पुष्टी झालेल्या प्रकरणांसह अमेरिका ९४ व्या क्रमांकावर आहे तर १.१ कोटींपेक्षा जास्त प्रकरणांसह भारत ८६ व्या क्रमांकावर आहे. युरोपमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेल्यांसह ब्रिटन ६६ व्या स्थानी आहे. निर्देशांकात युरोप आणि अमेरिकेपेक्षा आशिया-पॅसिफिकमधील देश अधिक यशस्वी झाले आहेत, असे लोवी संस्थेने आपल्या विश्लेषणामध्ये नमूद केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे