पुणे, २७ डिसेंबर २०२३ : भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील वर्षी ता. पाच जानेवारीला गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ट्वेंटी-२० क्रिकेट सामना रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. श्रीलंकेचा संघ आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात ट्वेंटी-२० मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ता. ३ जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना ता. ५ जानेवारीला पुण्यात, तर तिसरा आणि अंतिम सामना ता. ७ जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. यानंतर, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाईल. यातील पहिला सामना ता. १० जानेवारीला गुवाहाटी, ता. १२ जानेवारीला कोलकाता, तर तिसरा आणि अंतिम वनडे सामना ता. १५ जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल.
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान म्हणाले, की एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजिण्यात आलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना, तर तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आत्तापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय कसोटी, ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०; तसेच ‘आयपीएल’चे ५१ सामने झाले आहेत.
एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे याआधी झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला दोन विजय मिळाले होते. २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता.
दरम्यान, २०१६ मध्ये झालेल्या दुसर्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. २०२० मध्ये झालेल्या तिसर्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा ७८ धावांनी पराभव केला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील