मुंद्रा बंदरातून 3000 कोटींच्या ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी NIA टीम कच्छमध्ये दाखल

21
कच्छ, 28 ऑक्टोंबर 2021: गुजरातमधील मुंद्रा बंदरात जप्त करण्यात आलेल्या 3000 कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चौकशी करत आहे.  आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे एक पथक कच्छमध्ये पोहोचले आहे.  यापूर्वी, एनआयएने गेल्या 6 महिन्यांत आलेल्या संशयास्पद मालाच्या डेटाची छाननी केली आहे.  आता या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होऊ शकतात, असे मानले जात आहे.
यापूर्वी एनआयएने या प्रकरणी चेन्नई, कोईम्बतूर, विजयवाडासह देशातील अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत.  आरोपींच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  छापेमारीत तपास यंत्रणेने अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं आणि वस्तू जप्त केल्या आहेत.
 गुजरातमधील मुंद्रा बंदरातून सुमारे 2988 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं, त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि DRI यांना या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता.  पण 6 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास एनआयएकडं सोपवला.
डीआरआयच्या म्हणण्यानुसार, हेरॉइनची वाहतूक करणारे कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका फर्मने आयात केले होते आणि फर्मने ही खेप ‘टॅल्कम पावडर’ म्हणून घोषित केली होती.  अफगाणिस्तानातील कंदहार येथील हसन हुसेन लिमिटेड या निर्यातदार कंपनीची ओळख पटली आहे.
ही खेप इराण आणि अफगाणिस्तानमार्गे गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा बंदरात पोहोचल्यावर डीआरआय आणि कस्टम्सकडून त्याची तपासणी करण्यात आली.  त्यानंतर टॅल्कम पावडरच्या नावाखाली करोडो रुपयांची ड्रग्स आणल्याचं उघड झालं.  हे कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मने मुंद्रा बंदरात आयात केले होते.
 सुधाकर आणि वैशाली या दाम्पत्याला चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे.  भुज कोर्टात दोन्ही आरोपी पती-पत्नीला 10 दिवसांच्या रिमांडवर डीआरआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा