निगडी-प्राधिकरण परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव का? स्थानिक व्यावसायिकांचा प्रशासनास सवाल

7

निगडी, १४ जानेवारी २०२३ : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. या पथकाकडून बुधवारी (ता.११) निगडी-प्राधिकरण परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली; परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील अधिकारी ठराविक व्यावसायिकांनाच लक्ष्य करून अतिक्रमण काढत आहेत, असा आरोप स्थानिक व्यवसायिकांनी केला आहे. कारवाई करायची असेल तर सरसकट सर्व अतिक्रमणधारकांवर करावी, अशी मागणी व्यावसायिक नरेश शर्मा यांनी केली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी, की निगडी-प्राधिकरण परिसरातील भेळ चौकात असलेल्या दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले; परंतु त्याच्या शेजारी असणाऱ्या ‘ग्राहक बाजार’ या दुकानाचे अतिक्रमण ‘अ’ प्रभागच्या अधिकाऱ्यांनी काढले नाही. त्या दुकानाच्या समोर भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. असे असतानाही महानगरपालिकेचे अधिकारी हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनाच डोळ्यासमोर धरून कारवाई करीत असल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिक करीत आहेत.

‘अ’ प्रभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जण अशी कारवाई करीत आहेत, अस बोलले जात असून, इतर दुकानांसमोरील अतिक्रमण ‘अ’ प्रभाग काढणार का? असा प्रश्नही स्थानिक व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अर्थात अतिक्रमण करणे हेच मुळात चुकीचे आहे; पण कारवाई करायची असल्यास सरसकट सगळ्यांवर झाली पाहिजे. त्यात दुजाभाव का? असा सवाल स्थानिक व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा