कोरोना संसर्गामुळे नायकोबाची यात्रा रद्द

बारामती, दि. ३० जुलै २०२०: बारामतीमधील मासाळवाडी येथे ३ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने भरवण्यात येणारी नायकोबाची यात्रा कोरोनामुळे रद्द झाली आहे. यात्रेनिमित्त श्रींचे कऱ्हा व नीरा नदीवरील स्नान व भंडारा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामुळे भाविकांनी मंदिर आणि मंदिराच्या परिसरात न येण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे भाऊसाहेब कांबळे यांनी केले आहे.

अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील नायकोबा मंदिर यात्रा दरवर्षी  श्रावण महिन्यातील पौर्णिमेनिमित्त भरवण्यात येते. या यात्रा काळात श्रींस कऱ्हा नदी व नीरा नदीवर रथाद्वारे नेऊन स्नान घालण्याची गेल्या अनेक वर्षांची विशिष्ट अशी परंपरा आहे.

या स्नानासाठी राज्यातील अहमदनगर, बीड, नागपूर ,नाशिक, पुणे, ठाणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांतून हजारो भाविक – भक्त येत असतात . दरवर्षी सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक भाविक यात्रेनिमित्त येतात. मात्र सध्या असणाऱ्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार देवस्थान यात्रा कमिटीने यात्रा रद्द केली आहे. तरी भाविकांनी यंदा दर्शनासाठी येण्याचे टाळावे तसेच पौर्णिमेनिमित्ताने नायकोबा दर्शनासाठी न
येण्याचे आवाहन भाऊसाहेब कांबळे यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा