गॅंगस्टर निलेश घायवळचा सहकारी अमोल लाखेचा नवा गुन्हा उघड, वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे-गॅंगस्टर निलेश घायवळचा निकटचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा अमोल दत्ता लाखे पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात निलेश घायवळचे नावही पुन्हा चर्चेत आले आहे.

फिर्यादी सुरेश जालिंदर ढेंगळे (वय 32, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अमोल लाखेने शेती व व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, शेती उत्पन्न दाखले व फोटो घेतले. ही कागदपत्रे त्याने गैरवापर करून फिर्यादीच्या नावावर जिओ कंपनीचे सिमकार्ड (क्रमांक 9370622951) घेतले आणि ते स्वतः वापरले. या सिमकार्डचा वापर त्याने आपल्या एचडीएफसी व महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यांशी लिंक करून केला होता.

विशेष म्हणजे, हा मोबाईल क्रमांक गॅंगस्टर निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांच्या गुन्ह्यांमध्ये वापरला गेला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अमोल लाखे हा घायवळ टोळीशी संबंधित असल्याचेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून वारजे पोलिस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4) आणि दूरसंचार अधिनियम 2023 च्या कलम 42(3)(e) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अमोल लाखे आणि निलेश घायवळ या दोघांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, वारजेतील या नव्या प्रकरणामुळे घायवळ टोळीच्या आर्थिक गैरव्यवहारांचा नवा धागा समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: दिनेश वढणे