गँगस्टर निलेश घायवळ सध्या युरोप टूरचा आनंद घेत आहे. तीन महिन्यांचा व्हिसा घेऊन तो विदेश दौऱ्यावर गेला असून, पोलिसांकडे आता त्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. पुणे हे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखलं जातं. मात्र, सध्या हेच शहर गुन्हेगारीच्या पुराने वेढलं आहे. कोयता गँग, गँगवॉर आणि दहशतीच्या घटनांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचं दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी निलेश घायवळच्या टोळीतील आरोपींनी क्षुल्लक कारणावरून एका नागरिकावर गोळीबार केला, तसेच दुसऱ्यावर कोयत्याने वार केले. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला टोळी युद्धाचा भडका उडाल्यानंतर घायवळ टोळीच्या हल्ल्यांमुळे शहरातील सुरक्षेची स्थिती चिंताजनक झाली. पोलिसांनी आरोपींना अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी, घायवळ मात्र पोलिसांना गुंगारा देत विदेशात फरार झाला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा गुन्हेगार पासपोर्ट मिळवण्यात यशस्वी झाला. त्याने आपल्या नावाचं स्पेलिंग बदलून ‘Ghaywal’ ऐवजी ‘Gaywal’ असं अर्ज भरला. त्याशिवाय त्याने अहिल्यानगरमधील अस्तित्वात नसलेला पत्ता नमूद केला. कोतवाली पोलिसांनी तपासणी केली असता पत्ता चुकीचा असल्याचं स्पष्ट झालं, तरीसुद्धा त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला फक्त “Not Available“ एवढाच अहवाल दिला.
यानंतर पासपोर्ट कार्यालयाने इतर निकषांच्या आधारावर 16 जानेवारी 2020 रोजी त्याचा पासपोर्ट मंजूर केला. पुढे 2021 मध्ये पोलिसांनी घायवळला अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र, 2022 मध्ये त्याला जामीन मिळाल्यानंतर कोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. परंतु घायवळने पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलिसांनीही तो वसूल केला नाही. यामुळेच त्याला विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
आज घायवळ स्वित्झर्लंडमध्ये एन्जॉय करत असताना, पुणे पोलिसांकडे त्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. या सर्व घटनांमुळे पोलिस आणि पासपोर्ट कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील














































