कोथरूडमधील गोळीबारानंतर परदेशात पळालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरांवर छापे टाकून जिवंत गोळ्या, रिकामे पुंगळे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासादरम्यान मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित कनेक्शनदेखील समोर आले आहे.
कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर मकोका अंतर्गत कारवाईतून सुटून परदेशात फरार झालेल्या निलेश घायवळविरुद्ध आता पुणे पोलिसांनी सर्व आघाड्यांवर धडक मोहीम सुरू केली आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी घायवळविरुद्ध कारवाईचा फास आवळला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने कोथरूडसह पुण्यातील विविध ठिकाणांवरील त्याच्या घरांवर मोठी छापेमारी केली. या छाप्यात पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या, पुंगळे आणि घायवळच्या मालकीच्या मालमत्तांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. त्यामध्ये सातबारे, साठेखत तसेच मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाइल्स समाविष्ट आहेत.
पोलिसांनी घायवळच्या बेकायदेशीर बांधकामे आणि मालमत्तांविरोधात कारवाईसाठी पुणे महानगरपालिकेला अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रानंतर मनपाने हालचाल सुरू केली असून, अनधिकृत मालमत्ता आणि थकीत कर असलेल्या संपत्तीवर सील आणि जप्तीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. मनपाचे पथक लवकरच प्रत्यक्ष कारवाईसाठी मैदानात उतरणार असल्याचे समजते.
तपासादरम्यान उघड झाल्यानुसार, निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून विदेशात पलायन केले आहे. या प्रकरणावरून पुणे पोलीस आयुक्तालयाने त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, त्याच्या नावावरील बँक खाती गोठवण्याचे आणि बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
कोथरूड गोळीबारानंतर मकोका अंतर्गत कारवाईतून सुटून परदेशात पलायन करणाऱ्या निलेश घायवळविरुद्ध आता पोलिसांनी अत्यंत कठोर आणि सर्वसमावेशक मोहीम उघडली आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यातील संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १०९, ३५१, ३५२, १८९(१), १८९(२), १९०, १९१, २११, ११३(५) तसेच शस्त्रास्त्र कायदा कलम ३(२५), ३७(१)(३), १३५ आणि महासुरक्षा कायदा कलम ३(१), ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































