हल्ली तिला घरी यायला उशीर व्हायचा.. दारातच ती तास न तास उभी राहायची.. आज्जीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती.. आज्जी नेहमी म्हणायची पोरीच्या जातीने जरा जपून रहावं बरं..! असं पाय आणि मन भिरभिरू देऊ नये.. जरा लगाम घालावा लागतो. ती मानेला एकच झटका देऊन “हं” म्हणून रागवून निघून जायची..
आता ती उद्या घर सोडून जायच्या स्वप्नातच झोपली.. सकाळी जाग आली तर आज्जी अंगण झाडत होती.. तिने बादली भरून आणली, सडा टाकला, सुरेख रांगोळी रेखली.. आज्जी म्हणाली जा आता अंघोळ कर आणि दप्तर भर.. तिने दप्तर भरतानाच, त्यात तिचे दोनचारच असलेले कपडे भरले.. बंबातलं पाणी घेऊन अंघोळ केली.. अंघोळ करतानाच ती थोडी शहारली.. नुकत्याच तर तारूण्याच्या भावना जागृत होत होत्या तिच्या ..
नित्य नियमाप्रमाणे तिने बाहेर अंगणात चिमण्यांसाठी तांदूळ आणि एका भांड्यात पाणी ठेवलं, ठेऊन ती वळणार इतक्यातच तिला एक पिल्लू घरट्यातून उडण्याचा प्रयत्न करताना खाली पडलेलं दिसलं..
ती जोराजोरात किंचाळू लागली
“आज्जी आज्जी बघ नं इथे काय झालय”
आज्जी शक्य तेवढ्या भरभर बाहेर आली.. बघते तो निलूच्या हातात एक चिमणीचं पिल्लू होतं..
आज्जी जोरात बोलली
‘”निलू ठेव ते पिल्लू खाली”
पण निलू त्याच्या अंगाला लागलेली माती साफ करत होती.. त्याला खरचटले होते.. तिथे ती स्वच्छ करत होती.. निलूचे डोळे पिलाची धडपड बघून पाण्याने डबडबले होते
आज्जी म्हणाली “सोड त्या पिलाला”
निलू रडवेल्या स्वरात म्हणाली
“बघ नं किती लागलय त्याला”
आज्जी म्हणाली “तरीही त्याला सोड खाली”
निलूने नाईलाजाने पिलाला खाली सोडलं..तो छोटासा जीव थरथर कापत होता, धडपडत होता.. इतक्यात एक चिमणी आली आणि तिने त्या पिलाला टोचे मारायला सुरवात केली..आणखी तिथे तीन चार चिमण्या आल्या..सगळ्या त्या पिलाला टोचे मारायला लागल्या..पिल्लू कळवळून ओरडायला लागलं..अखेर पिल्लू निपचित पडलं. निलू रडायला लागली.. आज्जीनी निलूला घरात नेलं..
निलू खूप विचार करू लागली..आज्जी निलूसाठी चहा घेऊन आली..तशी निलू म्हणाली “आज्जी का गं त्या चिमण्यांनी त्या पिलाला मारलं?” आजी निलूच्या जवळ बसत म्हणाली “निलू नको त्या वयात म्हणजेच पंखात बळ यायच्या आतच ते पिलू उडायचा प्रयत्न करत होतं, आणि धडपडलं, म्हणून जखमी तर झालच, पण तुझा स्पर्श त्याला झाला आणि त्याला त्या चिमण्यांनी टोचूनटोचून मारलं”.
निलू ने मनाशीच विचार केला, आणि तिने दप्तरात भरलेले कपडे काढून घरातच ठेवले.. आणि पुस्तकं भरून ती शाळेला निघाली..
लेखक – अनामिक