मुंबई, ४ ऑक्टोंबर २०२०: केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. ज्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत सांगण्यात आलं होतं. मात्र, हा निर्णय राज्यांवर सोपवण्यात आला होता. राज्य सरकारनं त्यावेळी शाळा सुरू करण्यास नकार दिला होता. मात्र, ऑनलाईन शाळा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. यावर आता राज्य सरकारनं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये केवळ नववी ते बारावी या वर्गातील शाळा सुरू राहतील. नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.
दिवाळीनंतर राज्यात नववी ते बारावी शाळा सुरू होणार असल्या तरी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पहिली ते आठवी वर्गातील शाळा आधी प्रमाणं ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहतील. यासाठी सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रम देखील प्रसारित केला जात आहे.
नववी ते बारावीचे विद्यार्थी वयानं थोडे मोठे असतात, त्यामुळं हे पहिले पाऊल आपण उचलत आहोत. सर्व माहिती घेऊनच आपण शाळा सुरु करु, अधिवेशनात जशा आमदारांच्या तपासण्या केल्या गेल्या, तशा विद्यार्थ्यांच्या करता येतील का, याबाबत चाचपणी सुरु आहे. बाधित शिक्षक शाळेत जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. धोरण ठरवून नोव्हेंबरपासून शाळा सुरु करु, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुक करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे