सलग दुसऱ्या दिवशी निफाडचा पारा ५ अंशांवर; द्राक्षबागा धोक्यात

नाशिक, १० जानेवारी २०२३ : निफाड (जि. नाशिक) येथे थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १०) निफाडला पारा ५ अंशांवर स्थिरावला आहे. गावागावांत शेकोटीभोवती गप्पांचे फड रंगत आहेत. ऊबदार कपड्यांसह ग्रामीण भागात नागरिकांचा फेरफटका नजरेत भरू लागला आहे. तर दुसरीकडे द्राक्षबागा संकटात आल्याने द्राक्षउत्पादक चिंतेत आहेत.

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षपंढरीत मणी तडकण्याचा धोका कायम आहे. काचेसारख्या अवस्थेत द्राक्षमणी येत आहेत. अशात तडे गेलेल्या द्राक्षमण्यांची विरळणी करण्याचा बागायतदारांचा खर्च वाढणार आहे. अशा कडाक्याच्या थंडीत द्राक्षबागांमध्ये पाहाटेच्या वेळी पाणी देणे, शेकोटी पेटवून धूर करणे असे उपाय सुरू आहेत.

पारा घसरत असल्याचा फायदा रब्बीच्या गहू, हरभरा, कांदा या पिंकासाठी आहे; मात्र सध्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, नाशिक तालुक्यात द्राक्षबागांचा हंगाम सुरू होण्यावर आहे. शेकडो एकर द्राक्षबागा या फुलोरा अवस्थेकडून मणी सेटिंग व परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे घसरलेले तापमान हे द्राक्ष बागायतदारांच्या मुळावर येण्याचा धोका आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा