सातारा ७ डिसेंबर २०२३ : महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणारा निरादेवघर प्रकल्प ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा -फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला हे दुष्काळी तालुके येतात. गेली अनेक वर्ष रखडलेल्या अवस्थेमध्ये हा प्रकल्प होता परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीं या प्रकल्पासाठी मंजुरी देऊन निधीची तरतूद केली होती आणि आज केंद्र शासनाने यावर अंतिम मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिलाय. यामुळे या भागातील शेतकरी शेतमजूर यांचा पिण्याचा पाण्याचा आणि शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. यापुर्वीच्या सरकारने हा प्रकल्प रखडवला होता परंतु देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर असे अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागले, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीं माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की अनेक वर्ष हा प्रकल्प रखडला होता परंतु मी पंढरपूरमध्ये येऊन शब्द दिला होता या प्रकल्पास मंजुरी देईल. आज तो शब्द मी पाळला आहे. देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही राज्यांमध्ये सेन्ट्रल वॉटर कमिशन पाठवून हा प्रकल्प हायड्रोलिजकल दृष्ट्या योग्य आहे की नाही याचा सर्वे करून घेतला. भारत सरकारच्या टीमने यास टेक्निकल मंजुरी दिली. आज मला सांगताना आनंद होतो की भारत सरकारने यास गुणवत्ता स्पष्टता मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आता लवकरच दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध होणार असुन कायम स्वरुपी दुष्काळी परिस्थिती हाटणार आहे. हा परिसर आता आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम होईल तसेच या भागातील युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल. नोकरी निमित्ताने युवकांना मुंबई पुणे ला जावे लागणार नाही. असा विश्वास जलसंपदा मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार