निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी लाइव्ह दाखवण्याची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीत २०१२ साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार आहे. या फाशीचे लाईव्ह प्रसारण करण्यात यावे, अशी मागणी एका एनजीओने केली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे या मागणीचे पत्र देण्यात आले आहे. दिल्लीतील परी या संस्थेच्या संस्थापिका योगिता भयाना यांनी ही मागणी केली असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना तसे पत्र दिले आहे.

आपल्या पत्रात लिहिले आहे की, बलात्काऱ्यांना होत असलेली फाशी महिला सुरक्षेच्या विषयावर चिंता दूर करण्याची संधी भारताला आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना याचे थेट प्रसारण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच दिल्लीच्या पतियाळा कोर्टाने निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट काढले होते. १६ डिसेंबर २०१२ साली दिल्लीत बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला आहे. तर एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. उरलेल्या चार आरोपींना आता २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. त्या विरोधात देखील आरोपीचे वकील एपी सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र यावेळी त्यांना कोणतीही सूट मिळणार नाही, असे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा