मुंबई, १० सप्टेंबर २०२१: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर नोटीस बजावली आहे. नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज या कंपनीने डीएचएफएलकडून घेतलेले कर्ज न फेडल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार हे लुकआउट सर्क्युलर काढण्यात आले आहे. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. दरम्यान, यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्ज खातं मुंबईतील बँकेत आहे, मग पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस का बजावली? पाच महिने आधी लोन सेटलमेंटसाठी बँकेला पत्र देऊनही आता ही नोटीस का बजावण्यात आली? असे प्रश्न नितेश राणेंनी विचारले आहेत.
नितेश राणे म्हणाले, “हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाचे मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापुर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुले अशा नोटिसीला उपयोग नाही. त्यामुळे याप्रकराणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचची अडचण होणार महाविकास आघाडीची अडचण होणार.”
‘आम्ही ठाकरे सरकारची झोप उडवतोय म्हणून…’
आम्ही सतत भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहोत आणि ठाकरे सरकारची झोप उडवत आहोत, म्हणूनच असले प्रकार होताना दिसत असल्याचे नितेश राणे म्हणाले. ठाकरे सरकारला वाटते की असले प्रकार केल्यानंतर आम्ही घाबरून जाऊ, मात्र आमच्या नादी लागू नका, असा फालतूपणा करू नका, असे आवाहनही राणे यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे