केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी हे कधीही संकुचित विचारांच्या राजकारणासाठी ओळखले जात नाहीत. काम करणारा नेता आणि सातत्याने विकासाची भाषा बोलणारा राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. गडकरी अजातशत्रू असले, तरी अनेकांना ते स्पर्धक वाटतात, ही वस्तुस्थिती आहे. परिणामांचा विचार न करता ते लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवतात. आताही त्यांनी आयारामांचे स्वागत करताना निष्ठावंतांच्या होणाऱ्या उपेक्षेवर मार्मिक भाष्य केले. ते डोळ्यांत अंजन घालणारे आहे.
पक्षाला अनुकूल आणि प्रतिकूल काळ येत असतो. आताच्या काळात पक्ष कार्यकर्त्यांपेक्षा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’वर चालवण्यावर भर दिला जात असला, तरी त्यामुळे कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी होत नाही. कार्यकर्त्यांची अपार मेहनत आणि त्यांचे संघटन यावरच पक्षाची बांधणी होत असते. पक्षाच्या विचारावर अढळ श्रद्धा ठेवून, झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ असतात. त्यांच्या जोरावरच पक्ष उभा असतो.
पक्षासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता, घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भागणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनोवृत्तीवर पक्षाचा पाया भक्कम होत असतो. पक्ष मोठा झाला की त्याची काही जबाबदारी असते. आयुष्यभर सतरंज्या उचलणाऱ्यांचा सन्मान केला, तर निष्ठावंतांच्या कामाचे पक्ष योग्य मूल्यमापन करतो, असा संदेश कार्यकर्त्यांत जातो. त्यामुळे कार्यकर्तेही आणखी जोमाने काम करतात.
अलिकडच्या काळात पक्ष विचारसरणीवर वाढवण्यापेक्षा ‘आयारामांना’ घेऊन वाढवण्याची वृत्ती वाढली आहे. गेल्या काही वर्षांत पक्षांतरबंदी कायद्यात वारंवार दुरुस्त्या करूनही त्यातील पळवाटांचा आधार घेऊन घाऊक पक्षांतरे घडविली जात आहेत. त्यात भाजप आघाडीवर आहे. विचारधारा मागे पडली आहे. ज्यांच्याविरोधात आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्याच पालख्यांचे भोई होण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.
देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातील एक नेता मंत्री होता. काँग्रेसच्या विचारसरणीतून आलेल्या या नेत्याने त्यांच्या अधिकारात येणाऱ्या विविध पदांवर त्यांच्या नातेवाइकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यात भाजप आणि शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांपैकी एकालाही संधी देण्यात आली नव्हती. त्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे पाटील यांनी मंत्री असलेल्या या मोठ्या नेत्याची जाहीरपणे कानउघाडणी केली होती.
भारतीय जनता पक्षाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची घाई झालेली आहे. हे करताना काँग्रेसजनांना अहमदाबादच्या वॉशिंग पावडरने स्वच्छ धुतल्याचा कितीही दावा केला जात असला, तरी बाहेरून आलेल्यांचे गुण-अवगुण ते सोबत घेऊन येतातच. त्यामुळे अलिकडच्या काळात “भाजप काँग्रेस झाली आहे” अशी जी टीका होते, तिला आधार आहे. पक्ष वाढवताना तत्त्वशून्य तडजोडी केल्या, तर दुसरे काहीच वाट्याला येणार नाही.
सत्तेत असताना त्याविरोधात कुणीही बोलत नाही; परंतु सत्तेसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी आयारामांना पायघड्या घालताना जुन्या, जाणत्या, पक्षाच्या विचाराशी बांधील असणाऱ्यांची आपण उपेक्षा करतो आहोत, हे कुणाच्या ध्यानात येत नसले, तरी रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्याकडे वेधलेले लक्ष पक्षाला दुर्लक्षून चालणार नाही.
गेल्या तीन दशकांपासून देशात आणि राज्यात आघाड्यांचीच सत्ता आहे, हे मान्य केले, तर पक्षातील तसेच सरकारमधील खालच्या पदापासून वरिष्ठ पदापर्यंत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी अनेक जागा असतात. शिवाय निवडणुकीत संधी मिळण्याची वेगळी संधी असते. मित्रपक्षांना सामावून घेताना काही तडजोडी कराव्या लागतात हा भाग वेगळा असला, तरी आयारामांना घेताना त्यांच्या समर्थकांचा सन्मान आणि त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम निष्ठावंतांकडे कायमच चालू आहे.
गडकरी यांच्यासारखे उघडपणे कुणी बोलत नसले, तरी सामान्य कार्यकर्त्यांची जी भावना आहे, तिला गडकरी यांनी वाट मोकळी करून दिली. राज्यात तालुका पातळीपासून देशपातळीपर्यंतच्या ज्या समित्या आहेत, त्यावर एकदा नजर टाकली, तर निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करून आयाराम आणि त्यांच्या समर्थकांची कशी वर्णी लावली जाते, हे स्पष्ट दिसते.
पक्षासाठी खस्ता खाल्लेले बोलत नसतील; परंतु त्यांच्यातील नाराजी लपून राहत नाही. पक्ष वाढवण्यात कार्यकर्ते जसे कारणीभूत असतात, तसेच ते निष्क्रिय राहिले की पक्षाला जमिनीवर यायला वेळ लागत नाही. गडकरी यांनी नेमके याच बाबीवर बोट ठेवले.
नागपूर जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी ‘इनकमिंग’च्या राजकारणावर भाष्य करत पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. पक्षात नवीन लोक येत असतील, तर ते स्वागतार्ह आहे; पण त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि कष्टांचा आदर ठेवला पाहिजे, अशा शब्दांत गडकरी यांनी पक्षातील काही नेत्यांना सूचक संदेश दिला.
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. भाजपमध्ये नव्या नेत्यांच्या प्रवेशाचा ओघ वाढत असताना, पक्षातील वरिष्ठ नेते गडकरी यांनी यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नवीन लोकांचा ओघ आहे. हे चांगले आहे; पण ज्यांनी पक्ष उभा केला, कठीण काळात काम केले, त्यांना विसरून चालणार नाही, असे त्यांनी बजावले. या कार्यक्रमात गडकरी यांनी आपली खास नागपुरी शैली वापरत कार्यकर्त्यांना समजावले — “घर की मुर्गी दाल बराबर” आणि “बाहेरचे सावजी चिकन मसाला” असे काहीतरी झाले, असे म्हणत त्यांनी पक्षातील वातावरणाचे अचूक वर्णन केले.
गडकरी यांच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बसले होते. त्यांना थेट उद्देशून म्हटले की, निष्ठावंतांना डावलले की त्याचे परिणाम चांगले होत नाहीत.
केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्याला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व दिले जात आहे. भाजपमध्ये अलिकडे विविध पक्षांमधून आलेल्या नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत, तर जुन्या कार्यकर्त्यांना मागे सारले जात असल्याची नाराजी तळागाळात आहे. अशा पार्श्वभूमीवर गडकरी यांचे हे भाषण म्हणजे नाराज कार्यकर्त्यांना दिलासा आणि पक्षातील उच्चस्तरावर एक इशारा — असा दुहेरी अर्थ घेतला जात आहे.
त्यांच्या या विधानाने भाजपच्या अंतर्गत गटबाजीवरही पुन्हा प्रकाश टाकला आहे. राजकारणात निष्ठा, काम आणि जनतेशी असलेला संवाद हाच खरा पाया आहे. निवडणुका फक्त पैसा आणि प्रतिष्ठेच्या जोरावर जिंकल्या जात नाहीत. जुने कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ आहेत.
त्यांना विसरू नका, नाहीतर जेवढ्या वेगाने वर चढाल, तेवढ्याच वेगाने खालीही याल — असा थेट इशारा गडकरी यांनी दिला आहे. त्यांच्या या स्पष्ट शब्दांनी भाजपमधील अनेक नेत्यांचे कान टोचले गेले आहेत.
गडकरी यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या धोरणांवर आणि आगामी निवडणुकांतील उमेदवारीच्या समीकरणांवर नक्कीच परिणाम होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. जुने कार्यकर्ते हेच आपल्या पक्षाचे खरे बळ आहे. निष्ठावंत कार्यकर्ते जर नाराज झाले, तर पक्ष कितीही मोठा झाला तरी एका दिवसात खाली येऊ शकतो, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे.
आयारामांना पायघड्या घालताना गडकरी यांचा हा इशारा दुर्लक्षित केला, तर ते म्हणतात तशी वेळ येऊ शकते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी कोलांटउड्या मारताना दिसून येत आहेत.
आमदार, खासदारांच्या निवडणुका या नेत्यांच्या असतात. कार्यकर्त्यांनी त्या हातात घेऊन जिंकून दिलेल्या असतात. आता कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ पक्षावर आलेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका अशा ठिकाणी मित्रपक्षांबरोबरच आयारामांना प्राधान्य दिले, तर पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या निष्ठावंतांना अन्याय होतो. म्हणून बंड करायचे, दुसरीकडे जायचे की शांत बसून पक्षाला रामभरोसे सोडायचे — यापैकी एक पर्याय जुने, जाणते, निष्ठावंत निवडू शकतात.
याचे भान ठेवून भाजपला काँग्रेसयुक्त भाजप होऊ द्यायचे नसेल, तर पक्षाला योग्य निर्णय घ्यावा लागेल — हा गडकरी यांच्या म्हणण्याचा मतितार्थ आहे. ‘लेकी बोले, सुना लागे’ अशा धाटणीतील गडकरी यांचे हे बोल आहेत.
भागा वरखडे













































