पुणे, १२ ऑगस्ट २०२३ : पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असणाऱ्या चांदणी चौक परिसरात आजपासून ही समस्या संपणार आहे. पुण्यातील चांदणी चौक उड्डणपुलाचे लोकर्पण आज होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चांदणी चौक पुलाचे आज लोकार्पण होत असल्यामुळे डॉग पथक आणि बॉम्बशोध पथकाने परिसराची तपासणी केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी केली गेली. व्हिआयपी नेते असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
पुढील ५० वर्षांचा विचार करुन चांदणी चौक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला दीड लाख वाहने या ठिकाणावरुन सुसाट धावू शकतील. १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे.
मुंबईवरुन साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन होत्या आता तीन लेन असणार आहेत. त्याच पद्धतीने
साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन होत्या आता तीन लेन असणार आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सेवा रस्ते आहेत. मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन आहेत. बावधन, मुळशी आणि एनडीएकडून कोथरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन आहेत. बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती.
या प्रकल्पासाठी ८६५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ८३ हजार क्यूबिक मीटर क्राँक्रीटचा वापर त्याचबरोबर ५ हजार ७५० मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३ कालावधीत पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर