नवी दिल्ली, २२ ऑगस्ट २०२३ : भारतीय कार उत्पादक कंपन्यांना सुरक्षा रेटिंगसाठी त्यांच्या कार्स या ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राॅम-NCAP कडे पाठवण्याची गरज नाही. कारण, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, आज नवी दिल्ली येथे ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राॅम’ (Bharat NCAP) लाँच करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाद्वारे सरकारचा उद्देश असा आहे की कार ग्राहकांना बाजारात उपलब्ध असलेल्या वाहनांच्या अपघात सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी सुविधा देणे. म्हणजेच, जर एखादा ग्राहक कार घेण्याचा विचार करत असेल, तर गाड्यांच्या सेफ्टी रेटिंगच्या आधारे तो कोणती कार घ्यायची हे ठरवू शकेल. जसे रेटिंगमध्ये अधिक स्टार मिळणे म्हणजे उत्तम सुरक्षितता आहे. भारतीय कार उत्पादक कंपन्यांना सुरक्षा रेटिंगसाठी त्यांच्या कार ग्लोबल NCAPकडे पाठवण्याची गरज नाही. कारण, आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतीय सुरक्षा एजन्सी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP किंवा BNCAP) चे उद्घाटन झालं आहे.
‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राॅम’ कसे कार्य करणार?
मोटारींना GNCAP प्रमाणे एडल्ट आणि चाइल्ड सुरक्षा रेटिंग दिले जाणार आहे. यावरून अपघाताच्या वेळी कार आणि त्यात बसलेल्या प्रवासी यांचे किती नुकसान होऊ शकते हे कळण्यास मदत होईल. कारची क्रॅश चाचणी ५ टप्प्यांत केली जाणार आहे. कारच्या प्रत्येक स्तरावरील चाचणीसाठी गुण दिले जातील आणि त्याच्या आधारे त्याचे अंतिम रेटिंग निश्चित केले जाणार आहे.
सेफ्टी रेटिंग म्हणजे काय ? तर, क्रॅश चाचणीनंतर कारच्या एअरबॅगने काम केले की नाही, डमीचे किती नुकसान झाले? कारच्या इतर सुरक्षा वैशिष्ट्यांनी किती चांगले काम केले? या सर्वांच्या आधारे रेटिंग दिले जाते. हे रेटिंग ग्राहकांना सुरक्षित कार खरेदी करण्यास मदत करते. NCAP कोणत्याही कारच्या सर्व प्रकारांची क्रॅश चाचणी करत नाही.
भारत NCAP चा काय फायदा?
यामुळे स्टार रेटिंगच्या आधारे सेफ्टी कार निवडण्याचा पर्याय ग्राहकांना मिळेल. यासोबतच, देशात सुरक्षित वाहनांच्या निर्मितीसाठी मूळ उपकरण उत्पादक OEM यांच्यातील निकोप स्पर्धेलाही प्रोत्साहन दिले जाईल. या नवीन प्रणालीमुळे स्थानिक कार उत्पादनांनाही मदत होणार आहे. कार निर्माता कंपनी त्यांच्या वाहनांची भारतातील इन-हाऊस चाचणी सेवेमध्ये चाचणी घेण्यास सक्षम असतील. तसेच त्यांना त्यांच्या कार क्रॅश टेस्ट आणि स्टार रेटिंगसाठी परदेशात पाठवण्याची गरज भासणार नाही. कार सुरक्षा वैशिष्ठ्यात एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, ऑटो डोअर लॉक/अनलॉक, व्हेरिएबल लॉक/अनलॉक, रियर कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, डेटाइम रनिंग लाइट्स, रीअर डिफॉगर आणि वायपर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, सकाळ/ रात्रीचे आरसे आणि धुके लाईट समाविष्ट आहेत.
ग्राहकांना काय मिळणार?
ग्राहकांसाठी सुरक्षित कार निवडणे सोपे जाणार आहे. देशातच चाचणी होत असल्याने लवकरच या गाड्यांना रेटिंग मिळणार आहे. भारतात ही चाचणी सुरू झाल्यानंतर कंपन्या आता अधिक सुरक्षित वाहनांच्या निर्मितीवर भर देणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे