नागपूर, दि. १९ जून २०२०: महानिर्मिती आणि महाऊर्जाच्या कामकाजाचा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण, महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून एकत्रित प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याची भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्याच्या सूचना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिल्या.
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून वीजनिर्मिती यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पांकडे सर्वांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. सौर आणि पवन ऊर्जेचा संयुक्त प्रकल्प होऊ शकतो काय यावर देखील वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॅटचा आणि नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथील २५० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आढावा घेतला. गव्हाणकुंड प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, लवकरच वीजनिर्मिती सुरु होईल अशी माहिती यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी