नितीनजी त्या वटवृक्षाला वाचवा – आदित्य ठाकरेंचं गडकरींना पत्र

सांगली, दि.१७ जुलै २०२० : सांगलीतील एका ४०० वर्षाच्या वृक्षाला वाचवण्यासाठी वृक्ष प्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलन केले होते. याची दखल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरेंनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना हा ४०० वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

मिरज तालुक्यातील भोसे येथील यल्लम्मा मंदिराजवळील विशालकाय वटवृक्ष रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे . हे झाड ४०० वर्षांहून अधिक जूने असल्याने त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत .अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारून रस्ता करावा, अशी मागणी करीत आंदोलनाची हाक दिली. या महाकाय वटवृक्षानजीक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत सोशल डिस्टन्स ठेवत प्रतिकात्मक चिपको आंदोलन केले आणि पर्यायी मार्गाने रस्ता करून हा वटवृक्ष वाचवावा अशी मागणी केली होती.

ही घटना प्रसारमाध्यमांनी उचलून धरली होती. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत आपला विरोध दर्शवला होता आणि या वटवृक्षाची कत्तल करण्यात येऊन नये अशी मागणी केली होती. याचीच दाखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना हा ४०० वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा