लखनऊ, ५ ऑगस्ट २०२३ : देशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे सांगितलं जाते. उत्तर प्रदेश मधुन सर्वात जास्त ८० खासदार निवडून जातात. त्यामुळे उत्तर प्रदेशातच भाजपला मात देण्यावर इंडिया आघाडीने भर देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे इंडिया आघाडीचे मनसुबे आहेत. त्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव हे इंडिया आघाडीला मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. अखिलेश यादव यांच्या सहमतीने इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशात एक सर्व्हेही केला आहे.
नितीश कुमार यांना उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि राहुल गांधी यांना अमेठीतून उतरवण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. फुलपूरमध्ये कुर्मी समाजाची मोठी व्होट बँक आहे. ही व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठी नितीश कुमार हे अखिलेश यादव यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. फूलपूर हा मतदारसंघ म्हणजे राजाकरणाची प्रयोगशाळा मानली जात आहे. या मतदारसंघात जवाहरलाल नेहरू, कांशीराम यांच्यापासून ते अतिक अहमद याच्या पर्यंत अनेकांनी भाग्य आजमावले होते.
या मतदारसंघातील कुर्मी समाजाची मते मिळवायची असतील तर या मतदारसंघातून मोठा चेहरा द्यायला हवा असे समाजवादी पार्टीचे मत आहे. नितीश कुमार हे राजकारणातील मोठे नाव आहे. ते या मतदारसंघात उभे राहिल्यास भाजपला मोठा पराभव पत्करावा लागेल. बेनी प्रसाद वर्मा यांच्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला कोणताही मोठा चेहरा मिळाला नाही. मात्र, नितीश कुमार यांच्या रुपाने हा प्रश्न सुटणार आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार फूलपूरमधून उभे राहिल्यास उत्तर प्रदेशातील १० जागांवर मोठा फरक पडणार आहे. कारण उत्तर प्रदेशातील १० लोकसभा मतदारसंघात कुर्मी समाजाची निर्णायक मते आहेत. ही मते आपल्याकडे खेचण्याचा इंडिया आघाडीचा हा प्रयोग यशस्वी होतो का? हे पहावे लागेल.
उत्तर प्रदेशातील २५ हून अधिक जिल्ह्यात कुर्मी समाजाचा प्रभाव आहे. यातील १६ जिल्ह्यात १२% मतदार कुर्मी समाजातील आहेत. पूर्वांचल, बुंदेलखंड, अवध आणि रुहेलखंडमध्ये कुर्मी सामाजाची सर्वाधिक मते आहेत. त्यामुळेच इंडिया आघाडी फूलपूरमधून नितीश कुमार यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. या शिवाय जौनपूर, आंबेडकर नगर आणि प्रतापूरमधूनही नितीश कुमार यांना उतरवण्याची चर्चा आहे.
याचबरोबर अमेठीतून राहुल गांधी यांना बळ देण्याचा विचारही इंडिया आघाडी करत आहे. भाजपच्या गडातच आक्रमकपणे लढत देण्याची इंडिया आघाडीची रणनीती आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या बड्या राज्यात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली असून काँग्रेसने या दोन्ही राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर