दोषींना माफी नाही, मणिपूर मधील घटनेवर पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती

11

नवी दिल्ली, २० जुलै २०२३: मणिपूर मध्ये दोन्ही मुलींसोबत जे घडले, त्यामुळे अतिशय दुःख झाले आहे. या प्रकरणातील दोषींला माफी मिळणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. आज सकाळी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी ते बोलत होते.

मागील दोन महिन्यांपासून अधिक काळ हिंसाचारात होरपळणाऱ्या मणिपूर राज्यात संतापजनक आणि मानवतेला अत्यंत लाजिरवाणी करणारी घटना समोर आली आहे. राज्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा व्हिडिओ काल समोर आला होता. याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. हा प्रकार खरोखरच व्यथित करणारा आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्देश दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर