बारामतीत अजित पवारांना ‘नो एंट्री’, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

पुणे, २७ ऑक्टोबर २०२३ : आजकाल महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नेत्यांच्या प्रवेश बंदीची हाक दिली होती. अशा स्थितीत या आवाहनाला आता उत्साहवर्धक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत संपली असून, त्यानंतर मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजही आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी नेत्यांना बंदी घातली आहे.

अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका आता सर्वपक्षीय नेत्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कराखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. बारामतीत होणाऱ्या कार्यक्रमाला अजित पवारांनी येऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.

मराठा समाजाच्या तीव्र भावना पाहता अजित पवार आणि दादा भरणे यांनीं मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये. आम्ही हजारोंच्या संख्येने तेथे पूर्ण ताकदीने उपस्थित राहणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी सांगितले. हा कार्यक्रम घेतल्यास मराठा समाजाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा