कोव्हॅकसिनच्या चाचणीवर कोणीही प्रश्न उपस्थित करू नये: बायोटेकचे सीएमडी कृष्णा एला

हैदराबाद, ५ जानेवारी २०२१: भारतात दोन लसींना मंजुरी मिळाल्यानंतर राजकारण जोरात सुरू आहे. दरम्यान, भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा एला यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की, “काही लोकांकडून या लसीचे राजकारण केले जात आहे, मला असे स्पष्टपणे सांगायचे आहे की, माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे यावर कोणतेही राजकारण होऊ नये.”

एमडी कृष्णा एला म्हणाले की, “आम्ही केवळ भारतातच क्लिनिकल चाचण्या घेत नाही. आम्ही यूकेसह १२ पेक्षा जास्त देशांमध्ये क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत. आम्ही पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि अन्य देशांमध्ये क्लिनिकल चाचण्या घेत आहोत.” भारत बायोटेकच्या कोव्हॅकसिनला आपातकालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मंजूर केले आहे. ही मंजुरी घाईत देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

लस बनवण्याचा चांगला अनुभव

मिळालेल्या परवानगी वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर एला म्हणाले की, “केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) २०१९ च्या अटींच्या आधारे ही मंजुरी देण्यात आली आहे. आम्ही लसी बनवण्याचा अनुभव नसलेली कंपनी नाही. आम्हाला लस बनवण्याचा खूप अनुभव आहे. आम्ही १२३ देशांसाठी काम करत आहोत. असा अनुभव असणारी आम्ही एकमेव कंपनी आहोत. तर आमच्या लसीवर कोणतेही प्रश्न उपस्थित करू नका.”

एला म्हणाले की, “बरेच लोक असे म्हणत आहेत की आमच्या डेटामध्ये पारदर्शकता नाही. अशा लोकांना आवर घालणे आवश्यक आहे आणि इंटरनेटवरील डेटाशी संबंधित प्रकाशित लेख वाचले पाहिजेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ७० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.”

अमेरिकेतसुद्धा ही सुविधा नाही

डॉ. कृष्णा एला म्हणाले की, “ही अभिमानाची बाब आहे की संपूर्ण जगामध्ये केवळ आमच्याकडे बीएसएल -३ उत्पादन सुविधा आहे. ही सुविधा अमेरिकेकडे देखील उपलब्ध नाही. आम्ही जागतिक स्तरावर आरोग्य सेवांमध्ये आपत्कालीन सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत मग त्या काहीही असोत.” तिसऱ्या टप्प्यातील चाचणीबाबत बोलताना ते म्हणाले की, “येत्या दोन-तीन दिवसात ते पूर्ण होऊन जाईल. तसेच फेब्रुवारी किंवा मार्चच्या अखेरपर्यंत याचा संपूर्ण डेटा देखील दिला जाईल.”

ते म्हणाले की, “मर्कच्या इबोला लसीवर मानवी क्लिनिकल चाचणी कधीच पूर्ण झाली नाही, परंतु डब्ल्यूएचओने लायबेरिया आणि गिनीसाठी आपत्कालीन प्रयोगांना परवानगी दिली होती.” कृष्णा एला म्हणाले की, “सध्या आमच्याकडे २० कोटी डोस आहेत. चार केंद्रांवर ७ कोटी डोस क्षमता संपादन करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यातील तीन हैदराबादमध्ये तर एक बंगळुरूमध्ये आहे. सुरुवातीला लसची किंमत थोडी जास्त असू शकते.”

थरूर यांचे विधान

शशि थरूर यांनी म्हटले आहे की, “कोव्हॅकसिनने अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली नाही. या लसला यापूर्वीच परवानगी देण्यात आली असून ही धोकादायक ठरू शकते.” कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जाब विचारला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा