मुंबई – देशात एका दिवसात तीन चित्रपटांनी १२० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे समोर आले आहे. असे जर असेल तर देशात मंदी आहे, हे कसे म्हणता येईल, असा प्रश्न उपस्थित करत देशात मंदी नसल्याचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुंबईत शनिवारी स्पष्ट केले. तसेच देशात मोबाईल उत्पादन करणाऱ्या २६८ कंपन्या सुरू झाल्या असून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे, असे सांगत एनएसएसओचा बेरोजगारी वाढली असल्याच्या अहवालाचे खंडन करत काही जण चुकीचे अहवाल मुद्दाम देतात असा आरोप केला.
रविशंकर प्रसाद शनिवारी मुंबईत आले होते. भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले, देशात मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या सुरू झाल्या असून, मेट्रो आणि रस्त्यांचे काम सुरू आहे. मुद्रा योजनेत लाखों तरुणांना व्यवसायासाठी कर्ज दिले असून त्यांनी प्रत्येकी एका व्यक्तीला जरी नोकरीवर ठेवले असले तरी किती जणांना नोकऱ्या मिळाल्या असतील याची कल्पना करा, असे सांगत आपली अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत असून महागाईचा दरही नियंत्रणात आहे आणि एफडीआई सगळ्यात उंच स्तरावर आहे, असेही ते म्हणाले. ३७० कलमला काँग्रेस- राष्ट्रवादीचा विरोध का ?
महाराष्ट्रात निवडणुका असताना स्थानिक प्रश्नांऐवजी कलम ३७० चाच प्रचार का होतोय, असे विचारता रविशंकर प्रसाद म्हणाले, निवडणुकीत राष्ट्रीय आणि राज्याचे प्रश्न मांडले जातात. कलम ३७० हा देशाच्या एकतेचा विषय आहे आणि महाराष्ट्र देशाचा भाग आहे. त्यामुळे येथील जनतेलाही कलम ३७० बाबत उत्सुकता होती. हे कलम दूर केल्याने होत असणारे फायदे जनतेसमोर मांडण्यात चूक काय आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी याचा विरोध का करतात हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. तसेच अनेक संघटनांनी या कलमाला जाहीर पाठींबा दिला असल्याचे ते म्हणाले. या वेळी भाजप नेत्या शायना एन. सी आणि भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
शेतकरी आत्महत्येची कारणे वेगळी असू शकतात
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप काही केले असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, आत्महत्या होणे हे चूकच आहे. परंतु आत्महत्येला अनेक कारणे असतात. राज्य सरकारने कर्जमाफी, जलयुक्त शिवार, विम्याचे पैसे अशा मार्गांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असेही ते म्हणाले.