नाशिक : आतापर्यंत आपण नॉन व्हेजसाठी बाहुबली थाळी, रावण थाळी अशा अनेक प्रकारच्या थाळ्या पाहिल्या असतील. मात्र आता जे नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी आता “हिंद केसरी” नावाची नवीन थाळी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. ही महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी थाळी असल्याचा दावा हॉटेल चालकाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकमधील हे “हिंद केसरी” हे हॉटेल चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिकच्या मखमलाबाद जवळील हिंद केसरी हे हॉटेल सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरली आहे. या थाळीची किंमत पाच हजार रूपये आहे. या थाळीत उकड सुप, ८ पापलेट, ८ सुरमई, २५ कोळंबी फ्राय, २० रस्सा कोळंबी, ८ चिकन लेग पिस, चिकन करी, सुके चिकन, सुके मटण, खिमा, 8 ज्वारीच्या भाकरी, ८ बाजरीच्या भाकरी, ८ तांदळाच्या भाकरी, १६ चपाती, २४ सागोती वडे, सोलकढी, झिंगा चटणी, कोळंबी रस्सा, खेकडा रस्सा आणि भात यांचा समावेश आहे. ही थाळी उचलायला दोन माणसेही कमी पडतात.
या थाळीचा आस्वाद घेण्यासोबतच ही जंबो थाळी आहे तरी कशी हे बघण्यासाठी नाशिककर येथे गर्दी करत आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी थाळी असल्याचा दावा हॉटेल चालकांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही थाळी जर आठ लोकांनी संपवली तर त्या आठ लोकांना महिनाभर मोफत जेवण या हॉटेलकडून देण्यात येणार आहे.
कोल्हापुरी जेवणाची चव नाशिककरांनाही अनुभवता यावी मग तो तांबडा-पांढरा रस्सा, चिकनचा काळा रस्सा असो किंवा कोंबडी वडे यासोबतच संपूर्ण कुटुंबाने, मित्र मंडळींनी एकाच ताटात रुचकर जेवणाचा पोटभर आनंद लुटावा हा या हिंद केसरी थाळी तयार करण्यामागील उद्देश आहे.