पुणे : जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्यक्तींना समाजाला न्याय देण्याची संधी असते, त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी केले.
यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे जनसंपर्क क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी सत्र संचालक डॉ. बबन जोगदंड, पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी राठोड म्हणाले, जनसंपर्क क्षेत्राची ज्यांना आवड आहे. त्यांनीच या क्षेत्रात आले पाहिजे, केवळ नोकरी मिळते म्हणून या क्षेत्रात आल्यास आपण योग्य तो न्याय देवू शकत नाही. जनसंपर्क क्षेत्राचे विविध पैलू उलगडून सांगतांना ते म्हणाले, प्रसिध्दी ही कला आणि शास्त्र या दोहोंचा संगम आहे. ही कला दिसू न देण्यातच खरी कला आहे. आपण केवळ सेवक म्हणून न रहाता सहभागीदाराच्या भूमिकेत राहिले पाहिजे.
यशस्वी जनसंपर्क अधिकारी होण्यासाठी आवश्यक गुणांचीही त्यांनी माहिती दिली. ज्ञान हीच शक्ती असल्याने जनसंपर्क अधिका-याकडे ज्ञानाचे भांडार असायला हवे, माहिती आणि संदर्भ याबाबत अद्ययावत माहिती असायला हवी. अभिलेख्यांचे दस्ताऐवजीकरण, वेगवेगळया क्षेत्रातील लोकांशी (ओपिनीयन मेकर्स) मैत्री, पत्रकारांशी संवाद साधण्याचे कौशल्य, वाचन-मनन-चिंतन आदी गुण अवगत करता आले पाहिजे.
बदलत्या माध्यमांचा संदर्भ देत राठोड म्हणाले, माध्यमांचे स्वरुप प्रचंड वेगाने बदलत आहे. माणसांना जोडण्याचे काम माध्यमे करीत आहेत. जनसंपर्क अधिकाऱ्यांनीही सोशल मिडीयाचा कार्यक्षमपणे वापर केला पाहिजे. आपल्या कार्यातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून त्यांना न्याय दिला पाहिजे, याबाबत त्यांनी काही अनुभव सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी यशदाच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा गौरव केला. जनसंपर्क क्षेत्र हे आव्हानात्मक तसेच अत्यंत महत्त्वाचे असून दररोज वेगवेगळा अनुभव येत असतो. या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यशदामार्फत मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्रसंचालक डॉ. बबन जोगदंड यांनी यशदाच्या कार्याची माहिती सांगून भविष्यातही वेगवेगळया नावीन्यपूर्ण प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
समारोपात मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव विनोद माळाळे, उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे, कोल इंडियाचे जनसंपर्क अधिकारी जेट्टी राम दिलीप, डॉ. शंकर मुगावे, पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी श्रध्दा पाटील, दत्तात्रय कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.