अशी व्यक्ती होणे नाही ….

मुंबई: २७ जानेवारी २०२२;  ती एक व्यक्ती नव्हती, तर एक व्यक्तिमत्त्व होते. त्या व्यक्तिमत्वाचे नाव होते. डॅा. अनिल अवचट. पत्रकार, साहित्यिक आणि लेखक. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे संचालक असलेल्या अनिल अवचट यांचे आज ७७ व्या वर्षी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची मुलगी मुक्ता आणि यशोदा मुली, असा परिवार आहे.

अनिल अवचट यांची लेखक म्हणून ओळख आहे. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.

अनिल अवचट यांना व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेचअमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार , महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, मिळालेले आहेत. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली आहेत.

अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले. अशी व्यक्ती होणे नाही. डॅा. अनिल अवचट यांना न्यूज अनकटची भावपूर्ण आदरांजली .

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा