…आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय होणार आधारकार्ड अपडेट

10

हवी कुटुंबप्रमुखांची परवानगी

नवी दिल्ली, ता. ४ जानेवारी २०२३ : ‘यूआयडीएआय’ने आधार कार्डधारकांसाठी एक मोठी सुविधा आणली आहे. आता तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय तुमचे आधार अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबप्रमुखांची परवानगी लागणार आहे. अनेकवेळा आधार अपडेट करताना सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, ही गैरसोय आता दूर होणार आहे.

ज्यांच्याकडे स्वत:ची कागदपत्रे नाहीत, त्यांच्यासाठी हेड ऑफ फॅमिली आधारित आधार अपडेट प्रक्रिया खूप फायदेशीर आहे. संबंधित व्यक्ती त्यांच्या कुटुंबप्रमुखाच्या कागदपत्रांचा वापर करून आधारमध्ये टाकलेली माहिती सहज अपडेट करू शकतात. मुले, पत्नी/पती, आई-वडील यांसारख्या लोकांना त्याचा लाभ मिळू शकतो.

अनेकवेळा मुलांकडे आधारव्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे नसतात. अशा परिस्थितीत तो त्याच्या पालकांच्या कागदपत्रांचा वापर करून आधार अपडेट करू शकतो. ‘यूआयडीएआय’ने ३ जानेवारी २०२३ रोजी यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता फक्त कुटुंबप्रमुखांच्या दस्तऐवजांच्या मदतीने स्वत:च्या कागदपत्रांशिवाय आधार अपडेट करता येणार आहे.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार
या प्रकरणाची माहिती देताना ‘यूआयडीएआय’ने म्हटले आहे, की जर तुम्हाला हेड ऑफ फॅमिलीच्या कागदपत्रांद्वारे तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर त्यासाठी त्या व्यक्तीसोबतचे तुमचे नाते सिद्ध करावे लागेल. यासाठी रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतील. तुमच्याकडे कोणतीही असे कागदपत्र नसल्यास सेल्फ डिक्लेरेशन भरून ‘यूआयडीएआय’कडे सादर करावे लागेल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा