आता हत्तींना देखील मिळणार मोफत राशन, केरळ सरकारचा निर्णय

केरळ, दि. २५ जून २०२०: काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. ज्यामध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननसामध्ये स्फोटके टाकून खाण्यास देण्यात आले होते. यामध्ये त्या हत्तीणीचा व तिच्या गर्भात असलेल्या पिल्लाचा मृत्यू झाला होता. झालेल्या प्रकारावरून केरळ सरकारच्या कमकुवत कारभारावर टीका करण्यात आल्या होत्या.

केरळ सरकारने झालेल्या घटनेतून धडा घेत पुढील संभाव्य घटना टाळण्यासाठी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आता केरळ सरकारने आपल्या ताब्यात असलेल्या हत्तींच्या जेवणाची काळजी घेण्याचं ठरवलं आहे. या हत्तींसाठी केरळमधील रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य मिळणार आहे. यामध्ये तांदूळ (१२० किलो), गहू (१६० किलो), रागी (१२० किलो), गुळ (६ किलो) हळद-मीठ व इतर खाद्यपदार्थ हत्तींसाठी मोफत दिले जाणार आहेत.

केरळचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पी. थिलोत्थमन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना सांगितले की, “करोनामुळे सर्वांसाठीच खडतर परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांसोबत प्राण्यांनाही या परिस्थितीचा फटका बसला आहे. त्यामुळे आमच्या ताब्यात असलेल्या हत्तींची काळजी घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यांचाही जीव वाचवणं महत्वाचं आहे.”

विशेष म्हणजे केरळमध्ये ४९४ हत्ती आहेत आणि एका हत्तीची काळजी घेण्यासाठी दर दिवशी २००० रुपये एवढा खर्च येतो. ४९४ हत्तींपैकी बहुतांश हत्ती हे देवस्थांनाकडे तर काही हत्ती हे खासगी मालकांकडे आहे. या हत्तींची काळजी घेताना अनेकांना त्रासाचा सामना करावा लागला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ही मदत केली जात असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा