नवी दिल्ली, 6 जून 2022: भारतीय गव्हाच्या निर्यातीबाबत आता नवा ट्विस्ट आला आहे. आता आफ्रिकन देश इजिप्तने सुमारे 55,000 टन गव्हाला प्रवेश देण्यास नकार दिलाय. मुळात हा गहू तुर्कीला जाणार होता.
रॉयटर्सने इजिप्तचे प्लांट क्वारंटाइन चीफ अहमद अल अत्तार यांच्या हवाल्याने म्हटलंय की 55,000 टन गहू घेऊन जाणाऱ्या जहाजाला इजिप्तमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नकार देण्यात आला होता. त्याच वेळी, तुर्की क्वारंटाइन प्राधिकरणांनी या जहाजाच्या येण्यावर आधीच बंदी घातली आहे.
तुर्कीने सांगितलं ‘सडलेले गहू’
भारतीय गव्हात रुबेला विषाणू आढळून आल्याच्या तक्रारीमुळं तुर्कीने ही खेप स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर ते इजिप्तला पाठवण्यात आले. मात्र, तुर्कस्तानला पाठवलेल्या गव्हाची खेप भारतातून थेट निर्यात केली जात नव्हती. भारतीय कंपनी आयटीसी लिमिटेडने नेदरलँडमधील एका कंपनीला ते विकले होते. त्यानंतर ते तुर्कीला पोहोचले.
नंतर बातमी आली की ही खेप इजिप्शियन व्यापाऱ्याने विकत घेतली आहे आणि जहाज आता गहू घेऊन या आफ्रिकन देशात रवाना झालं आहे. आता इजिप्तनेही या गव्हाला ‘नो एंट्री’चा बोर्ड दाखवल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
भारत पाहणार मंजुरीची वाट
एका वेगळ्या बातमीत, भारत सरकारने पुष्टी केली आहे की ते इजिप्तला गहू निर्यात करण्यासाठी सीमाशुल्क मंजुरीची प्रतीक्षा करेल. तत्पूर्वी, तुर्कीचा गहू परतल्यावर अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी गुरुवारी सांगितलं की, भारतातून गव्हाची खेप पाठवण्यापूर्वी क्वारंटाइन आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. गव्हाची खेप घेण्यास नकार देण्याबाबत अद्याप तुर्की अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले होते.
इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गहू आयातदार
इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गहू आयात करणारा देश आहे. मे महिन्यातच इजिप्तचे अन्न पुरवठा मंत्री अली मोसेल्ही यांनी थेट भारताकडून 5 लाख टन गहू खरेदी करण्याचा करार केला होता. हा करार सामान्य निविदा प्रक्रियेपेक्षा वेगळा असणार होता, परंतु त्यावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. यापूर्वी एप्रिलमध्ये इजिप्तच्या कृषी मंत्रालयाने भारतातून गहू आयात करण्यास परवानगी दिली होती.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढलीय. त्याचा परिणाम इजिप्तवरही झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात, युरोपियन युनियन (EU) गव्हाची किंमत सुमारे 43 रुपये प्रति किलो आहे, तर भारतीय गहू 26 रुपये किलो दराने विकला जात आहे. दोघांमधील किमतीत 17 रुपये प्रति किलोचा फरक आहे.
भारताने गव्हाच्या निर्यातीवर घातली बंदी
अलीकडेच, 13 मे रोजी भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यापूर्वी, भारताने तुर्कीला 56,000 टन गव्हाची खेप मंजूर केली होती. त्याचवेळी इजिप्तचे अन्न मंत्री अली मोसेल्ही यांनीही स्पष्ट केले होते की, या बंदीमुळं भारत आणि इजिप्तमधील करारावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण या बंदींचा दोन्ही सरकारांमधील आयात-निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे