नवी दिल्ली, दि. ७ ऑगस्ट , २०२०: कोरोना जागतिक स्तरावर पसरवण्यात चीन कारणीभूत आहे. तसेच जगभरातील सर्वच देश चीन वर टीका करत आहेत. त्यामुळे चीनमध्ये व्यवसाय करताना तंत्रज्ञानातील जागतिक प्रतिस्पर्धीही अधिक सावध झाले आहेत. त्यापैकी बऱ्याच देशांनी आपले बस्तान गुंडाळून आपल्या देशात वापसी करण्याचा विचार सुरू केला आहे. तर थायलंड, व्हिएतनाम आणि भारत यांसारख्या बाजारपेठांकडे इतर उत्पादनांसाठी आणि निर्यातीसाठी जगभरातील अन्य देश पाहत आहेत.
भारतात आपले उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी अॅपलही प्रयत्नशील आहे. आयफोन एक्स बरोबर आता आयफोन ११ तयार करण्यास अॅपलने सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अॅपलसोबत करार असलेल्या कंत्राटदार उत्पादक कंपन्याही चीनहून भारतात येण्याबाबत विचार करत आहेत. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील बाजारपेठेतून एकच वेळी ५ अब्ज डॉलर्स किमतीच्या आयफोन्सची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेऊन अॅपलची एक मोठी कंत्राटदार उत्पादक कंपनी असल्यामुळेच चीनमधून सहा उत्पादक लाईन भारतात हलविण्याच्या विचारात आहे.
सुमारे ५५,००० भारतीय कामगारांना ही सुविधा प्रत्यक्षात उतरल्यानंतर वर्षभरातच रोजगार मिळू शकणार आहे. तसेच अॅपलला भारतातून वस्तू आयात करण्यासाठी मोठा करही द्यावा लागणार नाही. विक्रेते फक्त स्मार्टफोन बनवण्याचा विचार करीत नाहीत तर येत्या काही वर्षात लॅपटॉप ,टॅबलेट आणि इतर संगणकाच्या उत्पादनाकडे ही वळणार आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की, भारतात आय पॅड, मॅक बुक आणि आय मॅक तयार झाल्यास ते भारतीयांना स्वस्त किमतीत उपलबध होऊ शकतील.
यापूर्वीच भारतात अॅपलच्या मुख्य उत्पादकाकडून वस्तूंचे कंटेनर दाखल झाले असून, ते लवकरच याचे उत्पादन भारतात सुरू करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विस्ट्रोन, पेगट्रोन, फॉक्सकॉंन आणि सॅमसंग या निर्मात्यांनीही भारताच्या मेक इन इंडिया योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या पाच वर्षांत सुमारे २२ देशांतर्गत अन् जागतिक उत्पादक सुमारे ११.५ लाख कोटी रुपयांची उत्पादने तयार करतील आणि सुमारे ७ लाख कोटी रुपयांची निर्यात होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी निवेदनात दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी