मध्य प्रदेश, १७ डिसेंबर २०२२ : नवीन वर्षात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतू त्या आधीच ‘पठाण’ चित्रपटावरील वाद दिवसेंदिवस दिवस वाढतच जातोय. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने केसरी रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे वादाला सुरुवात झाली. तर शाहरुख खानने देखील या गाण्यात काही बोल्ड सीन दिले आहेत.
यावर भाष्य करत भगवा रंग वापरत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. तर यातील काही दृश्य आक्षेपार्ह असल्याचा मुस्लिम संघटनांचे मत आहे. मध्य प्रदेश हिंदू संघटनानंतर आता मुस्लिम संघटनांनीही चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. त्याप्रमाणे सिनेमा बोर्डने चित्रपटाला राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही दिला आहे.
ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीनेही चित्रपटाला विरोध करत मध्यप्रदेशच नाही तर संपूर्ण देशात ‘पठाण’ प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे. सोशल मीडियावरही ‘पठाण’ चित्रपटाला बायकाॅट करण्याची मागणी केली जाते आहे. तर बेशरम रंग गाण्यातील दीपिकाचे कपडे आणि काही सीन्स दुरुस्त केले नाहीत, तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे मत मध्य प्रदेशचे मंत्री डॉ.नरोत्तर मिश्रा यांनी मांडले आहे.
एवढेच नाही तर बुधवारी या चित्रपटाविरोधात इंदूरमध्ये काही लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शाहरुख आणि दीपिकाचे पुतळेही जाळले. ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीचे अध्यक्ष परीजादा खुरमकुरम मिया चिश्ती यांनी सांगितले की, या चित्रपटातून मुस्लिमांच्या भावना भडकावल्या गेल्या आहेत. शाहरुख खान असो किंवा कोणताही खान असो मुस्लिम धर्माचा अपमान होऊ देणार नाही.
- संपूर्ण देशात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही
तर उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अनस अली यांनी सुद्धा पठाण वर आक्षेप घेतलाय. केवळ मध्यप्रदेशात नाही तर संपूर्ण देशात आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात केवळ पठाणच नाही तर सर्व मुस्लिम समुदायाची बदनामी करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव ‘पठाण’ आहे आणि त्यात महिला अश्लील डान्स करताना दिसत आहेत, असे ते म्हणाले. तर निर्मात्यांनी ‘पठाण’ हे नाव हटवावे आणि त्यानंतर पाहिजे ते करावे अशी मागणी देखील सय्यद अनस आली यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. थोडक्यात दिवसेंदिवस पठाण समोरील आव्हाने वाढताना दिसत आहेत. सर्वांनी केलेल्या टिकेवर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे