आता आपले लक्ष महाराष्ट्र नसून दिल्ली आहे, महादेव जानकर यांचे विधान

सातारा, १२ जुलै २०२३ : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने सुरू केलेल्या जनसुराज्य यात्रेचा, काल माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण येथे समारोप झाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढयातून लढण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जानकर यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महादेव जानकर यांनी यावेळी, आपले लक्ष आता महाराष्ट्रात नसून दिल्लीकडे असल्याचे स्पष्ट केले.

महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. आपला पक्ष चांगला जम धरत आहे, आपल्याला लोक स्वीकारत आहेत. हे सांगण्यासाठी मी फलटणमध्ये आलो आहे. तुम्ही मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगत आहात, पण माझा डोळा ४८ लोकसभा मतदारसंघावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचा, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली काल शुभारंभ झाला. फलटणच्या आंबेडकर चौकात ही जनस्वराज्य यात्रा आली आणि तिचे रुपांतर छोटेखानी सभेत झाले. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिला.जन स्वराज्य यात्रेचे सर्वच पक्षांनी माढा मतदारसंघात स्वागत केले आहे. याचा अर्थ माझा कोणीच शत्रू नाही. मी शत्रुत्व का स्वीकारत नाही? कारण मी कोणाशीही येणाऱ्या काळात युती करू शकतो, असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिला.

मागच्या लोकसभा निवडणुकीत मी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि ती कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण कमळ आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे मी भाजपला सुनावले होते. हा गौप्यस्फोटही जानकर यांनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाव घेतात आणि ओबीसी मतावर निवडून येतात. मात्र हेच मोदी जातीनिहाय गणनेला विरोध करतात. जातीनिहाय जनगणनेला विरोध करणारे पंतप्रधान ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत का? असा सवालही त्यांनी केला. जातनिहाय जनगणना सर्व समाजाची होणे गरजेचे आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यास प्रत्येक जातीची लोकसंख्या कळेल. आणि त्या प्रमाणात त्या जातीचा किती विकास झाला हे सुद्धा समोर येईल. जेव्हा हे सत्यसमोर येईल तेव्हा काँग्रेस आणि भाजपने कशी फसवणूक केली हे सुद्धा उघड होईल, असेही जानकर म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा