नवी दिल्ली, १० फेब्रुवारी २०२३ : जगभरातील कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे सत्र काही केल्या थांबताना दिसून येत नाहीये. आता ‘याहू’ या टेक कंपनीनेही कर्मचारी कपात सुरू केली आहे. असे सांगितले जात आहे की, कंपनी २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते.
- १,६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका
कंपनी एकूण कर्मचार्यांपैकी २० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. जाहिरात तंत्रज्ञान विभागाची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या सांगण्यात आले होते की, १२ टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजे जवळजवळ १,००० जणांना कामावरून कमी केले जाणार आहे. तसेच येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल. अहवालानुसार, या कपातीमुळे याहूच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त ॲड टेक कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.
यापूर्वी मनोरंजन क्षेत्रातील डिस्नेमध्येही कर्मचारी कपात सुरू झाली आहे. कंपनीने सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी याबाबत माहिती दिली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक