लखनऊ, ५ नोव्हेंबर २०२०: माफिया डॉन अबू सालेमची बेकायदेशीर मालमत्ता जमा करण्याच्या बाबतीत लवकरच कारवाई केली जाऊ शकते. नुकतीच दहशतवादी दाऊद इब्राहिम याची संपत्ती देखील लिलावासाठी काढण्यात आली आहे. लखनऊ डेव्हलपमेंट अथॉरिटी (एलडीए) आणि यूपी पोलिस या दोन्हींच्या संयोगानं दहशतवादी दाऊद इब्राहिमचा साथीदार अबु सलेमच्या भावाची संपत्ती शोधण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. लखनऊमध्ये अबू सालेमचा भाऊ अबू जैश याच्या अवैध मालमत्ता ओळखल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अबू जैशनं कोट्यवधींच्या जमीनीवर कब्जा केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. या जमिनींमध्ये बर्याच सरकारी जमिनींचा समावेश आहे.
लखनौमधील सप्रू मार्गावर रेस्टॉरंट, मानक नगर मध्ये प्लॉटिंग बनवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या व्यतिरिक्त सर्वोदय नगर, ठाकूरगंज, लखनऊ येथेही कोट्यवधींच्या प्लॉटिंगची माहिती समोर आली आहे. फैजाबाद रोडवर बेकायदेशीरपणे गेस्ट हाऊस आणि हॉटेल चालवलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. यूपी प्रशासनानं एलडीए’ला अबू जैशच्या बेकायदेशीर संपत्तीची यादी करण्यास सांगितलं आहे. ज्यानंतर त्याचा भाऊ आणि जवळच्या मित्रांच्या मालमत्तेचा तपशील गोळा करण्यास सुरवात झाली आहे.
योगी सरकारनं राज्यातील मोठं माफिया नेटवर्क नष्ट करण्यासाठी मोठी मोहीम राबविली आहे. आतापर्यंत मोहिमेतील लक्ष्य मुख्यत: माफिया डॉन मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, अनिल दुजाना आणि सुंदर भाटी हे आहे. या माफिया गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीमधील ४० माफिया गुन्हेगारांकडं यूपी सरकार आणि पोलिसांची बारीक नजर आहे आणि त्यामुळं त्यांची सुमारे ३०० कोटी रुपयांची अवैध मालमत्ता आणि अवैध धंदे बंद झाले आहेत. यूपी सरकारनं राज्यात आतापर्यंत गँगस्टर ॲक्ट अंतर्गत ४९५ गुन्हे दाखल केले असून त्यापैकी बहुतांश मुख्तार अन्सारीचे गुंड आणि त्याच्या सहकार्यांच्या विरोधात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे