गोल पोस्ट इतर आता मोकाट जनावरांच्या मालकाला होणार दीड ते पाच हजारांचा दंड; पूर्वीची कारावासाची...

आता मोकाट जनावरांच्या मालकाला होणार दीड ते पाच हजारांचा दंड; पूर्वीची कारावासाची शिक्षा मात्र रद्द

मुंबई, १ मार्च २०२३ : ग्रामीण भागात बाजारपेठा, रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम पाच पट वाढविणारे विधेयक मंगळवारी (ता. २८) विधानसभेत समंत करण्यात आले; मात्र पूर्वीची एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे.

अनेक गावांमध्ये जनावरांचे मालक आपली गुरे दिवसभर रस्त्यावर सोडून देतात. ही गुरे चाऱ्यासाठी बाजारपेठा, रस्त्यांवर फिरत असतात. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. वाहनचालकांना त्याचा त्रास होतो. गोवंश हत्याबंदीनंतर तर हा प्रश्न आणखीनच गंभीर झाला आहे. मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी पूर्वी कायदा करण्यात आला; मात्र या कायद्यात मोकाट गुरे आढळल्यास मालकाला ३०० रुपये दंड आणि एक महिन्याचा कारावास अशा शिक्षेची तरतूद होती. यात बदल करण्याचे विधेयक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत मांडले. यापुढे कारावासाची तरतूद नसेल; पण दंडाची रक्कम पाच पटींनी वाढविण्यात आली आहे.

पूर्वी मोकाट जनावरांच्या मालकाला ३०० रुपये दंड व एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा होती. आता कारावासाची तरतूद रद्द करण्यात आली आहे; मात्र दंडाची रक्कम पहिल्या अपराधासाठी दीड हजार रुपये व त्यापुढील प्रत्येक अपराधांसाठी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version