पुणे-मुंबई, ५ ऑगस्ट २०२३: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम होणे आता नित्याचे झाले आहे. दर शनिवारी आणि रविवारी अपघातांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत सहा वेळा या रस्त्याची संथगती झाली आहे. एक्स्प्रेस वेवर भरमसाठ टोल भरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग २००२ मध्ये बांधण्यात आला होता. या ९४ किलोमीटरच्या महामार्गामुळे पुणे-मुंबईचे अंतर कमी झाले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक गतिमान झाला, मात्र २००२ नंतर आता २०२३ मध्ये या महामार्गावरील वाहनांची संख्या खूपच वाढली आहे. या एक्स्प्रेस वेवर आता क्षमतेपेक्षा जास्त वाहने धावत आहेत. त्यामुळे सर्रास अपघात आणि वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. या मार्गावर आणखी लेन जोडल्या जातील. आता याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तयार केला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दोन लेन वाढणार असून वाहतूक कोंडी संपणार आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बनवताना भविष्याचा विचार करण्यात आला होता. या मार्गावरून दररोज ४०,००० वाहने जातील, असा आराखडा तयार करून महामार्ग तयार करण्यात आला होता. मात्र आता या महामार्गावरून दररोज ६० हजार वाहने जात आहेत. त्यात शनिवार आणि रविवारी हा आकडा ८० ते ९० हजारांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर नेहमीच वाहतूक कोंडीची परिस्थिती असते. पावसाळ्यात दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला होता. तसेच अपघातांमुळे ही समस्या गंभीर बनते. अशा स्थितीत या समस्येवर लवकरच काम होणे गरजेचे होते, त्यावर आता सरकारने ठोस उपाय करण्याचे ठरवले आहे.
आता पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाप्रमाणे जुन्या मार्गावरही दोन लेन वाढवण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असुन दोन्ही रस्त्यांवर चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या संपणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना यातून दिलासा मिळेल अशी आशा प्रवाश्यांना आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड