आता मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार; SC च्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई, २८ सप्टेंबर २०२२ : शिवसेना कोणाची? पक्ष चिन्ह कोणाचे आणि शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात काल चारही बाजुंनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींनी एकमेकांसोबत चर्चा केली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे.

सकाळपासून शिवसेनेचा ठाकरे गट हा निवडणूक आयोगाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सिब्बल यांनी त्या दिशेनेच युक्तीवाद केला होता. शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच आहेत, निवडणूक चिन्हही त्यांच्याकडेच आहे. यामुळे निवडणूक आयोग आता यावर निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. पण आता मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुक आयोगाची जी काही प्रक्रिया आहे ती स्वतंत्र आहे.

आजचा निर्णय समोरच्यांचे डोळे उघडणारा आहे. कोणत्या गोष्टींसाठी आपण कोर्टात गेले पाहिजे. हे समजायला हवं असा टोलाही श्रीकांत शिंदेंनी लगावला. तसेच आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातोय. त्यामुळे आमचाच विजय होणार, असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही तासांपासून ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद सुरु आहे. शिवसेनेकडून युक्तीवाद करताना सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या सदस्यत्वावरच प्रश्न उपस्थित केला होता. सिब्बल यांनी शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, यावर लक्ष केंद्रीत केले होते. परंतू, खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या पारड्यात चेंडू टोलविला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा