बीड, १४ ऑगस्ट २०२३ : महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे भाजपच्या विरोधात लढत होते. मात्र शिवसेना फुटली आणि शिंदे गट, ठाकरे गट तयार झाला. त्यानंतर आता जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यातच राष्ट्रवादीत देखील फूट पडली आणि शरद पवार आणि अजित पवार गट बनले. यामुळे आता मविआ म्हणावी तशी एकसंघ राहिलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
या सर्व राजकीय घडामोडी नंतर आता आगामी निवडणुका कशा लढायच्या असा सवाल मविआच्या समोर उभा आहे. अजित पवार गट वेगळा झाल्याने आता काँग्रेसला बळ मिळाले आहे. यावरूनच बीड काँग्रेसचे प्रभारी आमदार अमित देशमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अमित देशमुख यांच्या वक्तव्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मोठा फटका बसणार अशी चर्चा रंगली आहे.
बीड येथे देशमुख यांनी काल काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आता स्वबळावर सुद्धा मैदानात उतरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. यापूर्वी आघाडी होती. आता ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणुका लढत होतो, तेच लोक दुसरीकडे गेले आहेत.त्यामुळे आता सर्वांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आता स्वबळावर निवडणुका लढण्याशिवाय पर्याय नाही असे अमित देशमुख यांनी म्हंटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर