आता युरोपातही UPI, हा देशही स्वीकारतोय ‘भारताचं प्रॉडक्ट’

नवी दिल्ली, 17 जून 2022: फिनटेक सेक्टर (Fintech Sector) मधील भारताचा दबदबा आता जागतिक होत आहे. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान UPI ​​आणि Rupay आता युरोपमध्ये पोहोचणार आहेत. आगामी काळात UPI आणि Rupay या दोन्ही सेवा फ्रान्समध्ये उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलीय. यापूर्वी भारताबाहेर नेपाळसह इतर काही देशांनीही UPI आणि Rupay कार्ड स्वीकारले आहेत.

या फ्रेंच कंपनीसोबत एनपीसीआयचा करार

अहवालानुसार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आंतरराष्ट्रीय युनिटने UPI आणि RuPay फ्रान्समध्ये उपलब्ध करून देण्यासाठी करार केलाय. फ्रान्सच्या लिरा नेटवर्कसोबत हा करार करण्यात आलाय. वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘संपूर्ण जग हे पाहत आहे की भारत दर महिन्याला 5.5 अब्ज UPI व्यवहार करत आहे. भारतासाठी ही मोठी उपलब्धी आहे. फ्रान्ससोबतचा ताजा करार हा एक मोठा टप्पा आहे.

भारतीय पर्यटकांना फ्रान्समध्ये असतील सुविधा

Lyra Network सोबतच्या कराराच्या अंमलबजावणीनंतर भारतीय पर्यटक फ्रान्समध्ये कोणत्याही अडथळ्याविना पेमेंट करू शकतील. फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ यांनी सांगितलं की, डिजिटल पेमेंटची ही पारदर्शक पद्धत फ्रान्समध्ये खूप प्रभावी ठरणार आहे. त्यांनी सांगितलं की ते एकदा डॉक्टरकडं गेले होते, जिथं फक्त रोख किंवा चेकने पैसे दिले जाऊ शकतात. यामुळं त्यांना एटीएममध्ये जावं लागलं. ते म्हणाले, ‘जर यूपीआय फ्रान्समध्ये उपलब्ध झाला तर फ्रान्सच्या लोकांनाही खूप फायदा होईल.

या देशांनी आधीच UPI स्वीकारलं

UPI हा पूर्णपणे स्वदेशी डिजिटल पेमेंट इंटरफेस आहे. हे इतकं सोपं आणि सुरक्षित आहे की यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने देखील त्याचं कौतुक केलंय. गुगलने अमेरिकेत UPI लागू करण्याची किंवा तत्सम तंत्रज्ञान विकसित करण्याची मागणीही केली होती. आता UPI भारताबाहेरही वापरला जात आहे. शेजारील देश नेपाळने नुकतेच नेपाळमध्ये UPI स्वीकारलं आहे. सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि भूतान यांनीही UPI स्वीकारलं आहे. भारतातील सर्व डिजिटल पेमेंट अॅप्स जसे की Google Pay, Amazon Pay, Paytm, BHIM UPI, BharatPe, PhonePe हे UPI इंटरफेसवर आधारित आहेत.

इतका जास्त आहे Rupay चा मार्केट शेअर

त्याचप्रमाणं, देशांतर्गत कार्ड नेटवर्क RuPay देखील गेल्या काही वर्षांत वेगाने वाढले आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, 2020 मध्येच, भारतीय कार्ड मार्केटमध्ये RuPay चा हिस्सा 60 टक्क्यांहून अधिक झाला होता, तर 2017 मध्ये हा वाटा केवळ 15 टक्के होता. Visa आणि Mastercard सारख्या दिग्गजांच्या भारतीय बाजारपेठेतील कार्ड नेटवर्कचा एकत्रित हिस्सा 40 टक्क्यांहून खाली घसरला आहे. तथापि, पेमेंट आणि व्यवहाराच्या बाबतीत व्हिसा आणि मास्टरकार्ड अजूनही रुपेपेक्षा पुढं आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा