मुंबई, २ ऑक्टोबर २०२२ : महाराष्ट्र सरकारने शनिवारी सरकारी आणि सरकारी अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नागरिक किंवा सरकारी अधिकाऱ्यांचे दूरध्वनी किंवा मोबाइल फोन कॉल्स घेताना ‘हॅलो’ ‘ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे अभिवादन वापरणे बंधनकारक करणारा सरकारी ठराव (जीआर) जारी केला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या जीआरमध्ये अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये ‘वंदे मातरम’चा वापर अभिवादन म्हणून करण्यासाठी जागरूकता निर्माण करावी, असे म्हटले आहे.
वंदे मातरम्” या शब्दाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी सन १८८७ या वर्षामध्ये लिहिलेले गीत सन १८९६ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम गायले गेले होते. सन १९०५ ला झालेल्या बंगालच्या फाळणी दरम्यान “वंदे मातरम्” हा परवलीचा शब्द होता. अनेक क्रांतिकारकांनी या गीताचा उद्घोष करत करतच बलिदान दिले होते. “इन्कलाब जिंदाबाद” आणि “वंदे मातरम्” या दोन शब्दांनी स्वातंत्र्य चळवळ भारावून गेली होती. या गीतावर व त्याच्या गायनावरही इंग्रजांनी बंदी घातलेली होती. मात्र तत्कालीन राजकीय पक्ष, क्रांतिकारक व सर्वसामान्य नागरिक यांनी ही बंदी झुगारून वंदे मातरम् गाण्यास सुरुवात केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड