नवी दिल्ली, दि. २३ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अम्फान या चक्रीवादळामुळे भारतात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी शोकभावना व्यक्त केली.
कोविड-१९ महामारीला तोंड देण्यासाठी मॉरिशसच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीच्या उद्देशाने १४ सदस्यांचे वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा घेऊन ‘ऑपरेशन सागर’ अंतर्गत भारतीय नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज पाठवल्याबद्दल मॉरिशसच्या पंतप्रधनांनी आभार मानले. मॉरिशस आणि भारताच्या जनतेच्या दरम्यान असलेल्या अतिशय जिव्हाळ्याच्या संबंधांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आठवण केली आणि या आपत्तीच्या काळात आपल्या मित्रांना मदत करण्याचे कर्तव्य भारत बजावत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशसकडून या आपत्तीला तोंड देण्यासाठी केलेल्या प्रभावी प्रयत्नांमुळे मॉरिशसमध्ये अनेक आठवडे कोणत्याही नव्या रुग्णांची नोंद झाली नसल्याबद्दल, या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक आपत्तींना तोंड देण्यासाठी बेटांवर असलेल्या इतर देशांना मॉरिशसने केलेल्या सर्वोत्तम उपाययोजनांचा आदर्श ठेवता येईल, असे पंतप्रधानांनी सुचवले.
मॉरिशसच्या आर्थिक क्षेत्राला पाठबळ देण्याच्या उद्देशानं आवश्यक उपाययोजनांसह सहकार्याच्या इतर क्षेत्रांबाबत आणि मॉरिशसच्या युवकांना आयुर्वेदिक औषधांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. पंतप्रधानांनी मॉरिशसच्या जनतेचे आरोग्य आणि कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेंच दोन्ही देशांच्या जनतेमध्ये असलेले जिव्हाळ्याचे संबंध कायम राहावेत अशी भावना व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी