राज्यात पावसाळा संपताच ‘ऑक्टोबर हीट‘चा तडाखा आणि दिवाळीच्या खरेदीची लगबग यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा ताण आला आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री अचानक येणारा तीव्र गारवा यामुळे हवामानातील हे मोठे चढ-उतार (१० ते १२ अंशांचा फरक) शरीराच्या तापमानाचे संतुलन बिघडवत आहेत. परिणामी, सर्दी, ताप, खोकला, घशातील संसर्ग आणि त्वचारोगांनी पुणेकरांना वेढले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
एकीकडे हवामानाचा हा लहरीपणा असताना दुसरीकडे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली अफाट गर्दी संसर्गाला आमंत्रण देत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, गर्दीत मास्क न वापरणे, सॅनिटायझरचा अभाव आणि सामाजिक अंतर न राखल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
तापमानातील अचानक बदल आणि वाढ-घट झाल्यास विषाणू अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे त्यांच्या संसर्ग पसरवण्याच्या क्षमतेत फरक पडतो. शरीराला या बदलांशी जुळवून घेता न आल्याने व्हायरल खोकला, ताप, अंगदुखी, घशात खवखव आणि थकवा अशी लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. काही रुग्णांमध्ये तर डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरचेही निदान होत आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय रजपूत यांनी या हवामानातील बदलामुळे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी नागरिकांना गर्दीत मास्क वापरण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि थकवा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीचा आनंद साजरा करताना आरोग्य जपणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे, यंदाच्या दिवाळीत खरेदीची काळजी घ्या पण त्याहून अधिक स्वतःच्या आरोग्याची!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे