सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी एक-दोन मोठ्या आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची प्रकरणे उघडकीस आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता एक रक्ताने माखलेली कार दोडामार्ग पोलिसांना सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कारची नंबर प्लेट गायब असल्यामुळे हा घातपात आहे की अपघात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून पोलिसांनाही वेगळ्या गुन्ह्याचा संशय आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाची सविस्तर माहिती घेतली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी मुख्य पुलाजवळ एक रक्ताने माखलेली कार सापडल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या कारची नंबर प्लेटही गायब आहे, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
ही रक्ताने माखलेली बेवारस कार सापडल्याचे समजताच दोडामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी (24 ऑक्टोबर) सकाळी काही स्थानिक नागरिकांना धरणाच्या मुख्य पुलाजवळ ही कार दिसून आली होती. इतक्या दुर्गम ठिकाणी ही कार कशी पोहोचली, असा प्रश्न त्यांना पडला. कारमध्ये रक्ताचे डाग दिसून आल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.
सध्या पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. नंबर प्लेट गायब असल्याने वाहनाच्या मालकाबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, वाहनाच्या चेसिस क्रमांकावरून प्राथमिक तपासात ही कार आंध्र प्रदेश येथील असल्याचे पोलिसांना समजले आहे. दोडामार्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील