भारत-पाकिस्तान सामन्यानंतर एकदिवसीय विश्वचषक संघाची घोषणा होणार!

पुणे, २९ ऑगस्ट २०२३ : एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारताने अद्याप आपला प्राथमिक संघ जाहीर केलेला नाही. मात्र, बीसीसीआयची वरिष्ठ निवड समिती ३ सप्टेंबरला १८ सदस्यीय संघाची घोषणा करू शकते. संघांना ५ सप्टेंबरपर्यंत १८ सदस्यीय संघाची घोषणा करायची आहे आणि त्यानंतर २८ सप्टेंबरपर्यंत त्यांना १५ सदस्यीय संघाची घोषणा करायची आहे.

२ सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशीच विश्वचषक संघाची घोषणा केली जाईल. आशिया चषक संघाची घोषणा करताना बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले होते की, एकदिवसीय विश्वचषक संघ हा, आशिया चषक स्पर्धेत निवडलेल्या खेळाडूंच्या आसपास असेल.

आशिया कप संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्त्याने सांगितले होते की, केएल राहुलला अजूनही किरकोळ दुखापत आहे आणि तो २-३ सप्टेंबरपर्यंत तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. या कारणास्तव तो २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत राहुल आशिया चषकाचा पहिला सामना खेळला नाही तर राहुलची संघात निवड होते की नाही हे पाहावे लागेल.

यासोबतच लेगस्पिनर युजवेंद्र चहलला विश्वचषकासाठी संघात स्थान मिळते की नाही, याकडेही लक्ष असणार आहे. आशिया चषकात चहलची निवड न झाल्याने निवड समितीच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. रोहितने पत्रकार परिषदेत असेही सांगितले होते की, चहलसाठी अद्याप दरवाजे बंद झालेले नाहीत. याशिवाय संघात एकही ऑफस्पिनर न निवडण्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा