दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची एनसीईआरटीकडून पडताळणी

संपूर्ण देशातून महाराष्ट्रातील एकमेव नवोपक्रमाची निवड

पुणे, ८ जानेवारी २०२३ : नाशिक येथील राष्ट्रीय शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भातोडे शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पडताळणी ‘एनसीईआरटी’चे अध्यक्ष डॉ. बी. पी. भारद्वाज यांनी करून समाधान व्यक्त केले.

देशातून २६ नावीन्यपूर्ण उपक्रमांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गणित हा विषय कठीण असल्याने तो लहानपणापासून सोपा जावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी हा विषय अबॅकसच्या साह्याने वेगळ्या पद्धतीने शिकविता येतो. अबॅकस हा विषय ग्रामीण आदिवासी परिसरात संपूर्णतः नवीन आहे. यासाठी स्वतः शिक्षकांनी अबॅकस शिकून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचे अध्यापन केले. महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी केंद्रातील जिल्हा परिषद भातोडे शाळेच्या ‘ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गणित संबोध सुलभ होण्यासाठी अबॅकसचा वापर’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची निवड झाली आहे. दिंडोरीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे या उपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन लाभले. ‘एनसीईआरटी’ दिल्लीद्वारा आयोजित ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस अँड एक्स्पीरीमेंट्स इन एज्युकेशन’ या स्पर्धेमध्ये भातोडे शाळेतील उपशिक्षिका ज्योती अहिरे यांनी यांनी सादर केलेल्या नवोपक्रम आराखड्याची निवड करण्यात आली.

संपूर्ण देशभरातून स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातून या एकमेव नवोपक्रमाची निवड झाली आहे. ‘एनसीईआरटी’चे अध्यक्ष डॉ. भारद्वाज यांनी शाळेस भेट देऊन उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. समवेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डी. डी. सूर्यवंशी, केंद्रप्रमुख किसन पवार, विशेषज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, मुख्याध्यापक उत्तम गायकवाड, शिक्षिका ज्योती आहिरे; तसेच शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा